जळगाव : दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे हतनूर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून धरण प्रशासनाने सहा दरवाजे अर्धा मीटरने उघडले आहेत. यामुळे धरणातून सध्या 6357 क्युसेक्स (180 क्युमेक्स) वेगाने विसर्ग सुरू आहे.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवार (दि.8) रोजी एकूण 172.4 मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी पर्जन्यमान 19.2 मिमी इतके होते. तर बुधवार (दि.9) रोजी पाणलोट क्षेत्रात एकूण 111.0 मिमी, तर सरासरी 12.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मागच्या काही दिवसापासून पाण्याची आवक घटल्याने जिल्ह्यातील हतनूर धरणाचे फक्त चार दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. मात्र, आज बुधवारी सकाळी पुन्हा पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे आणखी दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. एकूण सहा दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.तापी नदीत आता ६३५७८ क्सूसेकने विसर्ग सुरू आहे. हतनूर धरणाची एकूण पाणी पातळी २१०.४५ मीटर आणि पाणीसाठ्याची टक्केवारी ५४.६४ इतकी आहे, अशी माहिती हतनूर धरणाचे शाखाधिकारी भावेश चौधरी यांनी दिली.
Discussion about this post