मुंबई | फुले साहित्याचे अभ्यासक, विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी रामचंद्र नरके यांचं निधन झालं आहे. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून हरी नरके यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
डाव्या चळवळीशी नरके यांचा नजिकचा संबंध राहिला. फुले साहित्याचा अभ्यासक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी 56 पुस्तकांचं लेखन आणि संपादन केलं आहे.मराठीतील एक प्रसिद्ध लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि त्याचबरोबर मराठी ब्लॉगर अशी हरी नरके यांची ओळख राहिली. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक राहिले. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार, त्यांचं कार्य सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोवण्यात हरी नरके यांचा मोठा वाटा राहिला.याच आठवड्यात हरी नरके यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होतं. मात्र त्या आधीच त्यांची प्राण ज्योत मालवल्याने पुण्यातील साहित्य आणि डाव्या चळवळींच्या वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
Discussion about this post