चोपडा । सेंधवाकडून धुळ्याकडे जाणार्या चोपडा-शिरपूर रस्त्यावर चोपडा ग्रामीण पोलिसांनी बोलेरो पिकअप वाहनातून दोन लाख 28 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा व सुगंधी सुपारी जप्त करत आरोपाला ताब्यात घेतलं. या कारवाईने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
चोपडा ग्रामीण पोलिसांना सेंधवाकडून धुळ्याकडे जाणार्या चोपडा-शिरपूर रस्त्यावर हातेड फाटा येथे किराणा माल वाहून नेणार्या वाहनातून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बुधवारी सापळा रचला. पांढर्या रंगाची बोलेरो पिकअप (एम.एच.03 सी.पी.2497) आल्यानंतर तिची पंचांसमक्ष झडती घेतल्यानंतर त्यात एक लाख 94 हजार 480 रुपये किंमतीचा विमल पानमसाला व 34 हजार 320 रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू आढळली तर साडेचार लाख रुपये किंमतीचे वाहन मिळून सहा लाख 78 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सहाय्यक निरीक्षक शेषराव नितनवरे यांच्या फिर्यादीवरून प्रशांत मानकू भील (28, हेंकयवाडी, ता.धुळे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत.















Discussion about this post