जळगाव । शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाकडे उमेदवार नसल्याने ते निवडणूक लढू शकत नसल्याच म्हटलं आहे. त्याला माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी उत्तर दिले. त्यांच्या विरोधात लढणार असून दोन गुलाबात टक्कर होणार असल्याचे जाहीर केले आहे.
गुलाबराव देवकर यांनी ही जागा मेरिटप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाणार असल्याने, आपण या जागेवर उमेदवारी करणार आहे. त्यासाठी आपण गेल्या अनेक महिन्यापासून तयारी करत आहोत. या निवडणुकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात आपण लढणार असून,गुलाबराव विरोधात गुलाबराव अशी लढत नक्की होणार असल्याचं म्हटल आहे.
जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे गटाकडे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी प्रबळ उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान राहिले आहे.
शिवसेना पक्षाची ही जागा असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी उमेदवार जाहीर करण्याचे खुले आव्हान संजय राऊत यांना केले आहे. सेनेचा मतदार संघ असताना उमेदवार नसल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपली तलवार म्यान केली असल्याचं म्हटल होते.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या आव्हानाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मतदारसंघ सेनेकडेच राहिला आहे. त्यासाठी आम्ही ग्रामीण भागातील जनतेसाठी काम केले आहे. आमच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी, गद्दार नाही तर खुद्दार असे अनेक उमेदवार आहेत. आम्ही ही निवडणूक पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्याप्रमाणे आपण काम करणार असल्याच सेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ यांनी म्हटले आहे.
Discussion about this post