नाशिक : राज्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने दमदार एन्ट्री मारली असून याच दरम्यान, नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात हृदययद्रावक घटना समोर आली आहे.पावसामुळे एका जुन्या कंपनीच्या खोलीचा काही भाग घरावर कोसळून आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. तर यात एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याने गावात आणि परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा येथे गुलाब वामन खरे यांच्या घराच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. त्याखाली तीन जण दाबले गेले. या दुर्दैवी घटनेत आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला, तर घराच्या ढिगार्याखाली अडकलेल्या आजीला दिंडोरी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सदस्यांनी तत्परता दाखवित जेसीबीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले.
पहाटे चारच्या सुमारास सरपंच हिरामण गावित, शिपाई बाळू गवळी आणि ग्रामस्थांनी आत जात तिघांना बाहेर काढले. त्यात आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला होता, तर जखमी आजी विठाबाई यांना सुखरूप बाहेर काढत त्यांना दवाखान्यात नेले. सर्कल अमोल ढमके, तलाठी गिरीश बोंबले, ग्रामसेविका ललिता खांडवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सदर कुटुंबाला मदत मिळवूनदेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Discussion about this post