नवी दिल्ली : सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. खाद्यतेलाच्या किमतीत कपात झाल्याची चांगली बातमी लवकरच मिळू शकते. केंद्र सरकारने शुक्रवारी खाद्यतेल संघटनांना प्रमुख खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) प्रति लिटर ८-१२ रुपयांनी कपात करण्याचे निर्देश दिले आहे.
अन्न सचिव संजीव चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर अन्न मंत्रालयाने सांगितले की, “ज्या कंपन्यांनी त्यांच्या किमती कमी केल्या नाहीत आणि ज्यांची MRP इतर ब्रँडपेक्षा जास्त आहे, त्यांनाही त्यांच्या किमती कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.”
अन्न मंत्रालयाने काय म्हटले?
निवेदनानुसार, उत्पादक आणि रिफायनर्सने वितरकांना ऑफर केलेली किंमत देखील तात्काळ प्रभावाने कमी करणे आवश्यक आहे जेणेकरून कपातीचा परिणाम स्पष्टपणे दिसून येईल. उत्पादक/रिफायनर्सकडून वितरकांना जेव्हा जेव्हा किंमत कमी केली जाते तेव्हा त्याचा फायदा उद्योगांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि मंत्रालयाला नियमितपणे माहिती दिली जावी, असेही सांगण्यात आले.
मंत्रालयाने म्हटले आहे की खाद्यतेलाच्या किमतीतील घसरणीचा कल कायम आहे आणि खाद्यतेल उद्योग आणखी कपातीची तयारी करत आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, “घरगुती ग्राहक ते खरेदी केलेल्या खाद्यतेलासाठी कमी किंमत देण्याची अपेक्षा करू शकतात. खाद्यतेलाच्या किमती घसरल्याने महागाई कमी होण्यास मदत होईल. खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) प्रति लिटर ८-१२ रुपयांनी कपात करण्याचे निर्देश दिले आहे.