मुंबई l राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी यांच्या ७७व्या बलिदान दिनानिमित्त आज दक्षिण मुंबईतील महात्मा गांधी स्मारक असलेल्या ‘मणिभवन’ला भेट दिली.
सुरुवातीला राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली आणि प्रार्थना सभेत सहभाग घेतला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींचे आवडते भजन ‘रघुपती राघव राजाराम’ गायले. त्यानंतर राज्यपालांनी मणिभवन संग्रहालयाला भेट देऊन महात्मा गांधी ज्या कक्षात वास्तव्याला असत त्या वास्तूला भेट दिली.
या वेळी बोलताना राज्यपालांनी सर्वांना जात, पंथ आणि धर्म यांच्या संकीर्ण मतभेदापलीकडे जाण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा आणि सदाचाराच्या विचारांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सन १९५९ साली मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांनी आणि २०१० साली अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मणिभवनला दिलेल्या भेट दिल्याची माहिती मणिभवनच्या विश्वस्तांनी राज्यपालांना दिली.
या प्रसंगी मणिभवनच्या विश्वस्त व पदाधिकारी उषा ठक्कर, संध्या मेहता, योगेश कामदार, फाल्गुनी मेहता, रक्षा मेहता, मेघश्याम आजगांवकर आणि सजीव राजन उपस्थित होते.
१९१७ ते १९३४ या काळात मणिभवन हे महात्मा गांधींचे मुंबईतील निवासस्थान होते. मणिभवनच्या इतिहासानुसार १९१९ मध्ये महात्मा गांधींनी सत्याग्रहाची आणि १९३२ मध्ये सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात येथूनच केली होती.
Discussion about this post