राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली असून या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमाह 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी सरकारने एक योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत तरुणांना 6000 रुपयांपासून ते 10000 रुपये स्टायपंड मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे.
काय आहे ही योजना?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. या महापूजेनंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी लाडक्या भावांसाठी योजनेची घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजना लागू केल्यावर अनेकांनी टीका केली की, लाडक्या भावांचं काय? मला सांगायचं आहे की, लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे. आम्ही त्यांच्यासाठी एक योजना आणली आहे. या योजनेत 12वी पास तरुणांपासून ते 10 हजार रुपयांपर्यंत प्रत्येक महिन्याला स्टायपेंड दिले जातील. जो तरुण 12वी उत्तीर्ण झाला आहे त्यांना दर महिन्याला सहा हजार रुपये मिळतील. डिप्लोमा पास तरुणाला 8 हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत.
2024-25 या आर्थिक वर्षात राज्यातील तरुणांना या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण काळात विद्यावेतन मिळणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी तरुणाने एखाद्या कारखान्यात अॅप्रेन्टिसशिप करावी लागेल. त्या अॅप्रेन्टिसशिपचा तरुणाला अनुभव मिळेल आणि त्याच्याच आधारावर त्याला नोकरी सुद्धा मिळेल. अॅप्रेन्टिसशिप करणाऱ्या तरुणांना सरकारकडून पैसे मिळणार आहेत.
मात्र, एखादा तरुण एका महिन्यात 10 दिवस किंवा त्याहून अधिक दिवस गैरहजर राहिल्यास किंवा प्रशिक्षणार्थी तरुण पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यावर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेच्या संदर्भात लवकरच राज्य सरकारकडून शासन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
Discussion about this post