जळगाव । सोने आणि चांदी खरेदीचा बेत आखणाऱ्या ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात बुधवारी दिवसभरात सोन्याच्या दरात प्रति तोळा ११३३ रूपये आणि चांदीच्या दरात प्रति किलो २०६० रूपयांची वाढ नोंदविण्यात आली.
जळगावमध्ये मंगळवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १८ हजार ४५० रूपयांपर्यंत होते. बुधवारी सकाळी बाजार उघडताच १०३० रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्यानंतर चांदीचे दर जीएसटीसह सुमारे एक लाख १९ हजार ४८० रूपयांपर्यंत पोहोचले. दिवसभरात पुन्हा १०३० रूपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर सायंकाळपर्यंत एक २० हजार ५१० रूपयांवर स्थिरावले. चांदीच्या किमतीत गेल्या पाच दिवसात ४०९० रूपयांची वाढ झाली असून, दरवाढीत यापुढेही सातत्य राहण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
चांदी पाठोपाठ सोनेही वधारले आहे. बुधवारी दिवसभरात ११३३ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर एक लाख तीन हजार ८२४ रूपयांपर्यंत पोहोचले. सोन्याच्या दरातही गेल्या पाच दिवसात २३६६ रूपयांची वाढ झाली आहे.
दरम्यान, तज्ज्ञांच्या मते सध्याची जागतिक आर्थिक अनिश्चितता, परदेशी बाजारातील मागणीत झालेली वाढ, अमेरिकन डॉलरचे मूल्य कमी होणे आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित संपत्तीकडे कल, या सर्व गोष्टींमुळे सोने व चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
Discussion about this post