जळगाव । आजपासून डिसेंबर महिना सुरु झाला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी आता महागाईचा फटका ग्राहकांना बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकांचे बजेट पूर्णपणे कोसळले आहे. कारण जळगावमध्ये आज सोन्याच्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली.
मागील काही दिवसांत दोन्ही धातुंच्या दरांमध्ये सतत चढ-उतार दिसून आले असले तरी, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता वाढल्याने सोने व चांदीच्या किमती पुन्हा एकदा वरच्या दिशेने सरकल्या आहेत. गुंतवणूकदारांचा वाढता कल आणि अनुकूल जागतिक वातावरणामुळे मौल्यवान धातुंच्या दरांना अधिक मजबुती मिळत आहे.
जळगाव शहरातही शुक्रवारी १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोने तीन टक्के जीएसटीसह एक लाख ३१ हजार रूपयांपर्यंत, तर शनिवारी पुन्हा ११३३ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोने एक लाख ३२ हजार १४९ रूपयांपर्यंत वधारले होते. तशात सोमवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी ५१५ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने एक लाख ३२ हजार ६६४ रूपयांपर्यंत महागले. शहरात दिवाळीच्या आधी १७ ऑक्टोबरला २४ कॅरेट सोन्याने जीएसटीसह एक लाख ३५ हजार रूपयांचा उच्चांक केला होता. आताही सोन्यात कमी-अधिक फरकाने सातत्याने दरवाढ सुरूच आहे. त्यामुळे सोने मागील उच्चांक मोडीत काढून लवकरच नवीन उच्चांक करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दिवाळीच्या आधी एक लाख ९० हजारांचा उच्चांक करणाऱ्या चांदीची चकाकी मधल्या काळात थोडी कमी झाली होती. मात्र, आता पुन्हा मोठा उलटफेर चांदीच्या दरात झाला आहे. चांदी शनिवारी बाजार बंद होईपर्यंत एक लाख ७७ हजार १६० रूपयांवर स्थिरावली होती. सोमवारी सकाळी बाजार उघडल्यावर चांदीच्या दरात पुन्हा ५१५० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदी तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो एक लाख ८२ हजार ३१० रूपयांपर्यंत वधारली.















Discussion about this post