मुंबई । आज धनत्रयोदशी म्हणजे धनतेरसचा दिवस असून या दिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व आहे. यादिवशी ग्राहक सोन्या-चांदीच्या खरेदीला प्राधान्य देतात. पण गेल्या काही महिन्यांपासून सोनं -चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना सोनं-चांदी खरेदी करणे आवाक्याबाहेरच असल्याचे दिसून येत आहे.आज २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही सुद्धा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा सोन्याचा दर जाणून घ्या.
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे.
भारतात सोने-चांदीच्या किंमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी (28 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 79,800 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 650 रूपयांनी वाढ झाली असून याची किंमत 80,450 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,150 रूपये होता. त्यातही 600 रूपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 73,750 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 99,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.