नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीने नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा परिणाम सोने दरवाढीवर दिसून आला आहे. सोन्याचे भाव कधी कमी होणार याची प्रतीक्षा ग्राहकांना असताना भारतात या वर्षाच्या अखेरपर्यंत सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे १ लाख ३० हजार रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे.
जागतिक व्यापार युद्धाच्या (ट्रेड वॉर) पार्श्वभूमीवर सध्याच्या 3247 डॉलर्स प्रति औंस (सुमारे 28.3495 ग्रॅम) वरून आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमती 4500 डॉलरवर पोहोचू शकतात, असा अंदाज विदेशी गुंतवणूक फर्म गोल्डमन सॅक्सने वर्तवला आहे. यामुळे भारतात सोने लाखांवर जाणार आहे.
विदेशी गुंतवणूक फर्म गोल्डमन सॅक्सने वाढत्या अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा आणि मंदीच्या शक्यतेचा हवाला देत म्हटले आहे की, अत्यंत धोकादायक परिस्थितीत 2025 च्या अखेरीस सोन्याची किंमत 4,500 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. पण परिस्थिती बिघडली नाही आणि ती सामान्यच राहिली तर मात्र सोन्याची किंमत 2025 च्या अखेरीस वाढून 3,700 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
गोल्डमन सॅक्सने सोन्याच्या लक्ष्य किमतीमध्ये तिसर्यांदा वाढ केली आहे. यापूर्वी सॅक्सने सोन्याच्या किमतीचे लक्ष्य वाढवून 3,300 डॉलर प्रति औंस केले होते. अमेरिका-चीन व्यापार युद्धात वाढ झाल्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल वाढलेल्या चिंतेमुळे मंदीपासून बचाव करण्यासाठी सोन्याची मागणी वाढली आहे. सोन्याच्या किमतीत गेल्या आठवड्यात 6.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोव्हिड-19 नंतर सोन्याची ही सर्वोत्तम साप्ताहिक कामगिरी आहे. याचे कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफमुळे जागतिक स्तरावर वाढलेली अस्थिरता आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळत आहे, असे गोल्डमन सॅशने अहवालात म्हटले आहे.
Discussion about this post