जळगाव । अमेरिकेचे ५० टक्के आयात शूल्क लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर दोनच दिवसात सोन्याचे दर वधारले आहे. यामुळे जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज शुक्रवारी सोन्याने पुन्हा नवीन उच्चांक गाठला. यामुळे ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांना मोठा धक्का बसला आहे.
काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत सतत वाढ होताना दिसत आहे. कधी थोडी घसरण झाली तरी लगेचच पुन्हा दर उंचावतात. काल सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आज पुन्हा वाढ नोंदवली गेली आहे. ज्यामुळे सोने उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे.आज शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच प्रति १० ग्रॅम ५१५ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने २४ कॅरेट सोने दराने प्रति १० ग्रॅम जीएसटीसह एक लाख पाच हजार ४७२ रूपयांपर्यंत मजल मारून पुन्हा नवा उच्चांक केला.
चांदीचे दर स्थिरच
जळगावमध्ये चांदीचे दर चार दिवसांपूर्वी अचानक तीन हजार रूपयांनी वधारून एक लाख २१ हजार ५४० रूपयांपर्यंत पोहोचले होते. तेव्हापासून चांदीच्या दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आलेली नाही. हरितालिकेच्या दिवशीही चांदीचे दर स्थिर राहिले होते. शुक्रवारी देखील कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात न आल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख २१ हजार ५४० रूपयांवर स्थिर राहिले. ग्राहकांना त्यामुळे दिलासा मिळाला.
येत्या काळात सोने आणि चांदीच्या किमतीत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. सध्या सोन्याने नवीन उच्चांक गाठला आहे. यामुळे विशेषतः मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांच्या बजेटवर याचा मोठा ताण आला आहे. परिणामी, बाजारातील व्यवहार मंदावले असून आधीची गर्दी आणि उत्साह आता दिसत नाही.















Discussion about this post