धुळे : सोनं व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची खळबळजनक घटना धुळे शहरातील सावरकर चौकात घडली. दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत व्यापाऱ्याकडील सुमारे तीन किलो वजनाची सोन्याची बॅग हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित सराफ व्यापारी शहाद्याहून एसटी बसने धुळ्यात आले होते. सावरकर चौकातील बस थांब्यावर उतरताच चोरट्यांनी डाव साधला. सराफ व्यापारी बसमधून उतरताच मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी त्यांना घेरले. काही कळण्याच्या आतच त्यांनी हवेत दोन राऊंड फायर केले. यामुळे परिसरात प्रचंड गोंधळ उडाला होता. याच गोंधळाचा फायदा घेत दरोडेखोरांनी व्यापाऱ्याच्या हातात असलेली सोन्याची बॅग हिसकावली आणि पसार झाले. दरोडेखोरांनी व्यापाऱ्यावर आधीच पाळत ठेवली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून अद्याप या घटनेबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लुटलेल्या सोन्याचे वजन अंदाजे तीन किलो असण्याची शक्यता असून त्याची किंमत कोट्यवधींमध्ये मानली जात आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Discussion about this post