जळगाव । मागच्या काही दिवसापासून सोने व चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहण्यास मिळाले आहेत. दरम्यान आज सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठे बदल झाल्याचे दिसून आले. ज्यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांना मोठा धक्का बसला.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम एक लाख दोन हजार ७९४ रूपयांपर्यंत होते. सोमवारी सकाळी बाजार उघडताच शनिवारच्या तुलनेत २०६ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम एक लाख तीन हजार रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.
याशिवाय, शनिवारी चांदीचे दर प्रति किलो एक लाख १४ हजार ३३० रूपयांपर्यंत होते. सोमवारी तब्बल २०६० रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदी एक लाख १६ हजार ३९० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचली. दोन्ही धातुंच्या दरात आठवड्याच्या सुरूवातीलाच वाढ झाल्याचे लक्षात घेऊन ग्राहकांनी खरेदीसाठी थोडा हात आखडता घेतल्याचे दिसून आले.
दरम्यान, सोमवारी सकाळी डॉलरच्या निर्देशांकात अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याने देशांतर्गत वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी सांगितले.
Discussion about this post