मुंबई : तापी खोऱ्यातील गिरणा उपखोरे हे सर्वाधिक पाण्याची तूट असणारे खोरे आहे. या उपखोऱ्यात ४० टीएमसी पाण्याची तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
धुळे जिल्ह्यातील सिंचनाबबत सदस्य राघवेंद्र पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेत सदस्य अनिल पाटील यांनीही उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
मंत्री श्री. महाजन म्हणाले, नार- पार – गिरणा नदीजोड प्रकल्प अतर्गत १०.४९ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. काही तांत्रिक कारणास्तव पार- तापी- नर्मदा हा आंतरराज्य प्रकल्प रद्द करण्यात झाला आहे. हा प्रकल्प रद्द झाला असला तरी उपलब्ध होणारे पाणी तापी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या अनुषंगाने तांत्रिक आर्थिकदृष्ट्या तपासणी सुरू आहे. यामधून उपखोऱ्यात ९.६७ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन सुरू आहे. तांत्रिकदृष्ट्या तपासणी करून उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे.
धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा आणि सुलवाडे – जामफळ उपसा सिंचन योजना पुरेसा निधी देण्यात आलेला आहे. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यात पाणी आरक्षणाबाबत गतीने कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. गिरणा खोऱ्यातील सिंचन प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आणखी उपयोजना सुचवून सिंचनाचा प्रश्न सकारात्मकरित्या सोडवण्यात येईल,असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.
Discussion about this post