देहू । संत तुकाराम महाराजांचे वंशज, शिरीष महाराज मोरे (वय-30) यांनी आज सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या घटनेने परिसरात आणि वारकरी सांप्रदायात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कुठली अधिकृत माहिती नाही.
शिरीष महाराज मोरे हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज होते. मंगळवारी (५ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास उपरण्याच्या सहाय्याने त्यांनी गळफास लावून घेतल्याची माहिती आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक तसेच शिवशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष, प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत अशी शिरीष महाराज मोरे यांची ओळख होती. नुकतेच त्यांचे लग्न देखील ठरले होते. एवढं सगळं व्यवस्थित असताना त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले असेल असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. त्यांचे शवविच्छेदन पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात करण्यात येत आहे.
आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल
शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचेनेतून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याबाबत देहूरोड पोलिसांनी माहिती दिली आहे. हभप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर सायंकाळपर्यंत वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Discussion about this post