मुंबई । मागच्या काही दिवसापासून सुरु असलेल्या भारत पाकिस्तानात लष्करी कारवायांना पूर्णविराम लागला असून भारत आणि पाकमधील ने युद्धबंदीची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली. मात्र यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माघार घ्याचची काही गरज नव्हती अशी प्रतिक्रिया देत भारत सरकार ट्रम्प यांना मध्यस्थी करून कोणाला वाचवत आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. सिंदूर वैगेरे हे सर्व राजकारण खोटं आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो, असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधक ही युद्ध परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार कमी पडत असल्याची टीका करत आहेत. त्यावर आता भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली. तसेच स्थानिक संस्थांच्या निवडणुका पुढं जातील, असं संकेत देखील महाजन यांनी दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन ?
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, पाकिस्तानने वेळीच कुरापती थांबविल्या नाही, तर त्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल. भारतीय सैन्य दल व पंतप्रधान मोदींवर देशाचा पूर्ण विश्वास आहे. मात्र, खासदार संजय राऊत आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही काम नसल्यामुळे ते विरोध करत आहेत. युध्दजन्य परिस्थितीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? असा प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
काँग्रेस, मनसेवर निशाणा
काँग्रेसने दहशतवादाबाबत केंद्र सरकारला प्रश्न केला होता. सध्याचा प्रश्न दहशतवादाचा नसून पाकिस्तानकडून सुरू असलेली आगळीक आणि भारत विरोधी कारवाया हा आहे. त्याला आपल्या देशातील सरकारने चांगले उत्तर दिले आहे. हा दहशतवादाचा विषय वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे जलसंपदा मंत्री म्हणाले.
राज ठाकरे यांनी युद्ध करण्याची आवश्यकता होती का? प्रश्न केला होता. यासंदर्भात प्राप्त परिस्थिती आणि दोन्ही देशांच्या सीमेवर काय कारवाया सुरू आहेत हे स्पष्ट आहे. त्यामुळेच भारतीय सैन्याला पाकिस्तानला उत्तर देणे क्रमप्राप्त होते. त्या दृष्टीने आपण प्रभावी आणि पाकिस्तानला जर बसेल असे काम केल्याचे त्यांनी सांगितले.
Discussion about this post