जळगाव । बीडमध्ये झालेल्या इशारा सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन सरकारला अल्टिमेटम दिला आहे. २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मंत्री महाजन?
“मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटीशनवर निर्णय देताना सरकारची बाजू ऐकून घेण्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे एक विंडो ओपन झाली आहे. अशा परिस्थितीत मनोज जरांगेंवर मुंबईत उपोषणाला बसण्याची वेळच येणार नाही”, अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली आहे.
मंत्री महाजन पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटीशनवर निर्णय देताना सरकारची बाजू ऐकून घेण्याचा निकाल दिलाय. सर्वोच्च न्यायालय 24 जानेवारीला मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची बाजू ऐकून घेणार आहे. ही आपल्यासाठी सकारात्मक आणि जमेची बाजू आहे.
आपण मागासवर्गीय आयोग नेमला आहे. त्या माध्यमातून आपण त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. कुठंही त्रुटी राहू नयेत म्हणून आपण प्रयत्न करत आहोत. आपण नेमलेला मागासवर्गीय आयोग जोमाने काम करत आहे. मराठा समाजातील जे उपेक्षित घटक आहेत, त्यांचा अभ्यास केला जात आहे. या संदर्भातील सारे कागदपत्रे आपण सर्वोच्च न्यायालयासमोर मांडू. क्युरेटिव्ह पिटीशन ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालय आपल्याला शंभर टक्के आरक्षण देईल, असा दावाही गिरीश महाजन यांनी केला.
Discussion about this post