जळगाव । गिरीश महाजन यांची जळगावच्या जामनेरमध्ये सभा झाली. त्यात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर भाष्य करत आपले राजकीय प्रतिस्पर्धी आमदार एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला. खडसे यांनी जामनेर येथे मुक्कामी राहून विधानसभा निवडणुकीत माझा पराभव करून दाखवावा,असे ते म्हणालेत. त्यांच्या या आव्हानामुळे जळगावच्या तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे.
एकनाथ खडसे यांनी मला पाडण्याची भाषा करू नये. त्यांना मला पाडायचे असेल तर जामनेरला येऊन मुक्कामी रहावे. त्यानंतर मला पाडून दाखवावे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडवावा. त्यानंतर विकासावर बोलावे. हा जामनेर तालुका आहे. इथे त्यांनी काहीही केले तर त्यांची डाळ शिजणार नाही. माझ्याशी विकास कामांवर स्पर्धा करा. मंत्री असताना तुम्ही केलेले कारनामे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक आहेत. असा निशानाही मंत्री महाजन यांनी साधला.
खडसे यांना स्वतःची ग्रामपंचायतही जिंकता आली नाही. त्यांनी जामनेरच्या विकासावर बोलू नये, सदैव मी – मी करणाऱ्या त्यांच्याकडे आता काय राहिले आहे? त्यांच्याकडे जिल्हा बँक राहिली नाही. जिल्हा दूध संघ राहिला नाही. आमच्या मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगरला जाऊन मंदा खडसे वहिनी यांचा पराभव केला. आपण जेव्हा अहंकार करतो, गर्व करतो. सर्वकाही माझ्यामुळे झाले असे म्हणतो. तेव्हा कसे गर्वहरण होते हे आपल्या लक्षात आले असेल, असेही गिरीश महाजन यावेळी बोलताना म्हणाले.
Discussion about this post