औरंगाबाद । मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकार गंभीर असून त्यावर गतीने काम सुरू आहे, फक्त जरांगेंनी दिलेले 24 डिसेंबरचे अल्टिमेटम मागे घ्यावे, त्याचा आग्रह धरू नये असं आवाहन राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केलं.
मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकारचं काम हे गतीने सुरू असून मनोज जरांगे यांनी जरा सबुरीनं घ्यावं असं राज्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. त्यावर बोलताना आतापर्यंत सरकारला भरपूर वेळ दिला, सरकारने ठरल्याप्रमाणे करावं अशी मागणी जरांगे यांनी केली. त्यानंतर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, मागासवर्गीय आयोगाच्या कामाला वेळ अजून लागेल. राज्यात आतापर्यंत 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार आरक्षणाच्या विषयावर काम करतंय हे नक्की.
जरांगे यांनी 24 तारखेचा अल्टिमेटम आहे, पण अजून वेळ द्या. शेवटी समाजाचं हित महत्त्वाचं आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर अजून थोडा वेळ लागेल. मराठा आरक्षणावर क्युरेटिव्ह पिटिशन आणि मागासवर्गीय आयोग हे दोन पर्याय आहेत. असेही महाजन म्हणाले
भुजबळ आणि जरांगे यांनी शांतता राखावी
मराठा आरक्षणाच्या विषयावर मनोज जरांगे आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक वार सुरू आहेत. त्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, शब्दाला शब्द लागतो आणि वाद वाढतो. त्यामुळे छगन भुजबळ आणि मनोज जरांगे या दोघांनीही शांतता बाळगावी.
Discussion about this post