जळगाव । कापसाला यंदा प्रतिक्विंटल सुमारे सात ते साडेसात हजार रुपयांचा भाव मिळत आहे. हा भाव परवडत नसल्याने शेतकरी कापूस विकायला तयार नाहीत. परिणामी जिनिंग उद्योग देखील अद्याप ठप्प आहेत.
जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा विचार केला तर सुमारे दीडशे पैकी ७० ते ८० जिनिंग प्रेसिंग कारखाने बंद आहेत. तर जे सुरू आहेत; ते देखील पूर्ण क्षमतेने सुरू नाही. दरवर्षी दिवाळीपासून कापसाचा हंगाम सुरू होतो. डिसेंबरपर्यंत खान्देशात सुमारे तीन ते साडेतीन लाख गाठींची खरेदी होते. पण यंदा तशी परिस्थिती नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या कापसाला मागणी नाही. बांगलादेश, व्हिएतनाम, चीन हे देश प्रामुख्याने भारताचा कापूस खरेदी करणारे देश आहेत. पण त्यांच्याकडूनही हवी तशी मागणी अद्याप होत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. म्हणून कापसाची निर्यात ठप्प आहे.
शिवाय उत्पादन खर्च वाढल्यामुळे कापसाला किमान १० ते १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा; अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आज सीसीआय साडेसात हजार रुपयांचा भाव देत आहे. पण जाचक अटींमुळे शेतकरी तिकडे जायला तयार नाहीत. परिणामी शेतकरी कापूस विक्रीला न काढता घरातच भरून ठेवत आहेत.















Discussion about this post