जळगाव । जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यामुळे नागरिक धास्तावले आहे. यातच नातेवाइकांच्या लग्नानिमित्त चोपडा येथे कुटुंबासह गेलेल्या सुपडू गुलाब सोनवणे (वय ४०) यांचे गीताई नगरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ५८ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजता शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर उघडकीस आली. शनिपेठ पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
गीताई नगरात सुपडू सोनवणे हे पत्नी व मुलांसह वास्तव्यास असून कोल्ड्रिंक्सचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मावस साल्याचे २१ एप्रिल रोजी लग्न असल्याने सोनवणे कुटुंब घराला कुलूप लावून २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता चोपडा येथे गेले होते. मात्र, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सोनवणे यांचे घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरून नेली. २१ एप्रिल रोजी सकाळी सोनवणे यांच्या घराशेजारी राहणारे प्रवीण चौधरी यांना सोनवणेच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी तातडीने त्यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यानंतर सकाळी ११ वाजता सोनवणे यांनी घर गाठून घरात पाहणी केल्यावर त्यांना दरवाजाचा
कडीकोयंडा तुटलेला दिसला. तर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. लोखंडी कपाटातील दागिने व रोकड चोरीला गेल्याचे दिसून आले. नंतर त्यांनी लागलीच पोलिसात धाव घेतल्यानंतर संपूर्ण हकिगत सांगितली. यानंतर श्वान व ठसे तज्जा पथकांकडून घरात पाहणी करण्यात आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांत नोंद केली आहे.
Discussion about this post