नवी दिल्ली । उज्ज्वला गॅस योजनेतील अनुदानाच्या रकमेत केंद्र सरकारने वाढ केली आहे. देशातील सुमारे 10 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने उज्ज्वला गॅस योजनेसह इतर अनेक मोठे निर्णय घेतले. येत्या काही महिन्यांत देशातील 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकारने हा मोठा मास्टर स्ट्रोक खेळला असून, त्याचा फायदा देशातील असंख्य लोकांना होणार असल्याचे मानले जात आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली. त्यांनी X वर एक पोस्ट लिहिली, रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. 200 रुपयांच्या सवलतीसह एलपीजी सिलिंडरची किंमत 1100 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 200 रुपयांच्या अनुदानामुळे हाच सिलिंडर 700 रुपयांना मिळत होता.
मात्र आता मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने उज्ज्वलाच्या लाभार्थी माता-भगिनींना 200 रुपयांऐवजी 300 रुपये अनुदान देण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. म्हणजेच आतापर्यंत 700 रुपयांना मिळणारा एलपीजी सिलिंडर आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 600 रुपयांना मिळणार आहे. असे ते म्हणाले
देशभरात पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 9.6 कोटी आहे. लोकांना धुरापासून मुक्त करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली होती. या योजनेत फक्त गरजू वर्गातील महिलाच अर्ज करू शकतात. त्यांना मोफत सिलिंडर देण्याबरोबरच गॅस सिलिंडरही दर महिन्याला स्वस्त दरात उपलब्ध करून दिले जातात. दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आतापर्यंत 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरसाठी 703 रुपये देत होते, मात्र सरकारच्या निर्णयानंतर त्यांना 603 रुपयांना सिलिंडर मिळणार आहे.
Discussion about this post