नवी दिल्ली । गृहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून, एलपीजी गॅस सिलिंडरच्या बुकिंगसंदर्भातील नियमांमध्ये गॅस कंपन्यांनी बदल केले आहेत. नव्या नियमानुसार, आता डबल-सिलिंडर कनेक्शन असलेल्या ग्राहकांना पुढील सिलिंडर बुक करण्यासाठी मागील डिलिव्हरीपासून किमान ३५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यापूर्वी ही मर्यादा २५ दिवसांची होती.
गॅसचा काळाबाजार रोखणे आणि वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे गॅस वितरकांनी स्पष्ट केले आहे. या बदलाचा परिणाम विशेषतः दोन सिलिंडर कनेक्शन असलेल्या ग्राहकांवर होणार असून, घरगुती गॅस नियोजन अधिक काळजीपूर्वक करावे लागणार आहे.
तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता पुढील सिलिंडर बुक करण्यासाठी ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर एकाच सिलिंडरचे कनेक्शन असलेल्या ग्राहकांना २५ दिवस पूर्ण झाल्यानंतरच नवीन सिलिंडर बुक करता येणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, पुढील बुकिंगची पात्रता ही मागील बुकिंगच्या तारखेवर नव्हे, तर प्रत्यक्ष डिलिव्हरी झालेल्या तारखेवर आधारित असणार आहे. निर्धारित कालावधी पूर्ण होण्यापूर्वी बुकिंग करण्याचा प्रयत्न केल्यास ती विनंती प्रणालीद्वारे आपोआप नाकारली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.















Discussion about this post