जळगाव । सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने “उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार स्पर्धा 2025” आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेअंतर्गत राज्यातील सामाजिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची निवड करून त्यांना गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपले अर्ज दिनांक 26 ऑगस्ट 2025 पूर्वी mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत.
जिल्हास्तरावर नियुक्त निवड समिती संबंधित गणेश मंडळांच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन सजावट, उपक्रमांची माहिती, आवश्यक कागदपत्रे व व्हिडीओ संकलित करेल. स्पर्धेचे मूल्यांकन खालील घटकांवर आधारित असेल:
पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट
ध्वनीप्रदूषणविरहित उत्सव
सामाजिक प्रबोधनपर देखावे – “पाणी वाचवा”, “मुलगी वाचवा”, “अंधश्रद्धा निर्मूलन”, “स्वातंत्र्य चळवळीवरील देखावे” इत्यादी
आरोग्य, महिला, विद्यार्थी व वंचित घटकांसाठी उपक्रम
रक्तदान, वैद्यकीय सेवा
पारंपरिक खेळ स्पर्धा
गणेशभक्तांसाठी सुविधा व शिस्तबद्ध आयोजन
प्रत्येक जिल्ह्यातून एक गणेशोत्सव मंडळ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शिफारस करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या मंडळांना खालीलप्रमाणे पारितोषिके दिली जातील:
प्रथम क्रमांक – ₹5 लाख व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक – ₹2.5 लाख व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक – ₹1 लाख व प्रमाणपत्र
प्रत्येक जिल्ह्यातील विजेते मंडळ – ₹25 हजार व प्रमाणपत्र
या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Discussion about this post