जळगाव : छत्रपती संभाजीनगर मार्गावर उमाळा–गाडेगाव दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती–पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात झाला.
या अपघातात मुझफ्फरअली सय्यद (वय ६०) आणि त्यांच्या पत्नी ताहेराबी सय्यद (वय ५५, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) यांचा मृत्यू झाला. मुझफ्फरअली हे मसाला विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नासाठी ते पत्नीसमवेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर येथे गेले होते.
लग्न समारंभ आटोपल्यानंतर दुपारच्या सुमारास दोघे जळगावकडे परतत असताना उमाळा ते गाडेगाव दरम्यानच्या पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोघेही दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना खाजगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले.
दरम्यान, या अपघाताची सायंकाळपर्यंत पोलिसांत अधिकृत नोंद झालेली नव्हती. त्यामुळे अपघाताचे नेमके कारण आणि संबंधित वाहनाची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.















Discussion about this post