यावल : शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत बंगळुरू येथे कंपनीत अभियंता असलेले चेतन विनायक नेहेते (वय ३६, रा. राजोरे, ता. यावल) यांची २६ लाख ७४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळचे राजोरे येथील रहिवासी असलेले चेतन नेहेते हे बंगळुरू येथे खासगी कंपनीत अभियंता (मेंटेनन्स इंजिनिअर) आहेत. १० मार्च ते ६ जून यादरम्यान दोन जणांनी त्यांच्याशी संपर्क साधून व्हॉटस्अॅप ग्रुप व टेलिग्रामला जॉईन होण्यास सांगितले. त्यांना टेलिग्रामवर एक लिंक पाठवून पोर्टलवर नोंदणी करायला लावली. त्यांना मार्गदर्शन करीत त्यांचा विश्वास संपादन केला व ट्रेडिंगमध्ये जास्त फायदा करून देऊ, असे आमिष दाखविले. त्यातून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या बँक खात्यावर २६ लाख ७४ हजार रुपये स्वीकारले.
नंतर कोणताही परतावा त्यांना देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चेतन नेहेते यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.















Discussion about this post