बुलढाणा : सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना गंडविले जात असल्याचे प्रकार काही कमी होताना दिसत असून अशातच मणी लॉन्ड्रींग झाले असून डिजिटल अरेस्ट झाल्याचे सांगत एका वृद्ध व्यक्तीला २८ लाख ५० हजार रुपयात फसविल्याची घटना बुलढाण्यात घडली. आणखी रक्कम द्यायची म्हणून वृद्धाने थेट शेत जमीनच विक्रीला काढली होती. मात्र सायबर पोलिसांच्या सूचकतेने वृद्धाची रक्कम सुरक्षित राहिली आहे.
बुलढाण्यात एका वृद्धाला काही दिवसांपुर्वीच मुंबई क्राईम ब्रँचकडून बोलत असल्याचा फोन आला. यात तुम्ही एका प्रतिष्टीत व्यक्तीला तुमच्या फोन वरून अश्लील फोटोग्राफ्स पाठविले आहेत. तसेच मनी लॉंड्रींग झाले आहे; अशी बतावणी करून तुम्ही डिजिटल अरेस्ट झाले असल्याचे सांगण्यात आले. यामुळे तातडीने पुढील प्रोसेस पूर्ण करा; असे सांगून त्या वृद्ध व्यक्तीकडून २८ लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम उकळली.
६० लाख देण्यासाठी वृद्धाने शेती काढली विक्रीला
यानंतर पुन्हा त्याच्याकडे ६० लाख रुपयाची मागणी केली होती. त्या वृद्धा कडे एवढी रक्कम नव्हती. पैसे दिले नाही तर आपली बदनामी होईल; या भीतीतून वृद्धाने स्वतःची शेती विक्री करण्यासाठी काढली. या शेतीचे सर्व कागदपत्रे घेऊन बुलढाणा शहरात फिरत प्रत्येकाला सांगत फिरत होता की मला शेती विकायची आहे. कुठल्याही भावात विकायची या शेतकऱ्याची तयारी होती.
२२ लाख ५० हजार वाचले
दरम्यान त्या वृद्धला सायबर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असता वृद्धाला विश्वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा त्याने घडलेल्या सर्व प्रकारची माहिती सांगितली. त्यानुसार सायबर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पोलिसांनी संबंधितांचे खाते गोठवले व त्या वृद्धाचे २२ लाख ५० हजार वाचविले. यापूर्वी सुद्धा बुलढाणा जिल्ह्यात असे डिजिटल अरेस्टचे प्रकार वाढले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन ठाणेदार शिरीष खंडारे केले आहे.















Discussion about this post