नवी दिली । काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी 46 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली असून यामध्ये राज्यातील 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह इतर अनेक राज्यांचा समावेश आहे.
चौथ्या यादीत काँग्रेसने रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी बर्वे यांना संधी दिली आहे. तसेच नागपूर येथून विकास ठाकरे, गडचिरोलीमधून नामदेव किरसान आणि गोंदिया- भंडारा लोकसभा मतदारसंघातून प्रशांत पडोले यांना संधी देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या नवीन यादीनुसार, उत्तर प्रदेशात काँग्रेसचे प्रमुख अजय राय हे वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवणार आहेत. दिग्विजय सिंह मध्य प्रदेशच्या राजगढ मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर यूपीतील अमरोहा येथून दानिश अली आणि सहारनपूरमधून इम्रान मसूद यांना तिकीट देण्यात आले आहे.
काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील एकूण नऊ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सपासोबत युतीत काँग्रेस यूपीत फक्त 17 जागांवर निवडणूक लढवत आहे. फतेहपूर सिक्री मतदारसंघातून रामनाथ सिकरवार, कानपूरमधून आलोक मिश्रा, झाशीतून प्रदीप जैन, बाराबंकीमधून तनुज पुनिया, देवरियातून अखिलेश प्रताप सिंग, बांसगावमधून सदन प्रसाद, वाराणसीतून अजय राय यांना तिकीट देण्यात आले आहे. उत्तराखंडच्या नौनिताल-उधम सिंग नगर मतदारसंघातून प्रकाश जोशी आणि वीरेंद्र रावत यांना हरद्वारमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच काँग्रेसने प्रिया रॉय चौधरी यांना पश्चिम बंगालच्या कूचबिहार मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
लाल सिंह यांना जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमधून, तर रमण भल्ला यांना जम्मूमधून तिकीट देण्यात आले आहे. कावासी लखमा छत्तीसगडच्या बस्तर मतदारसंघातून उमेदवार असतील. याशिवाय तामिळनाडू, मणिपूर, मिझोराम, आसाम, अंदमान निकोबार, राजस्थानमधूनही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
Discussion about this post