पुणे । देशात वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. लवकरच पुणे शहरातून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावणार आहेत. यात एक म्हणजे पुणे-शेगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. दरम्यान भुसावळ – जळगाव मार्गे अद्यापही वंदे भारत एक्स्प्रेस धावत नाहीय. त्यामुळे पुणे-शेगाव दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आता तरी जळगावमार्गे धावणार का? याची प्रतीक्षा जळगावकरांना आहे.
पुणे शहरातून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावणार आहेत. या नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या पुणे-शेगाव, पुणे-वडोदरा, पुणे-सिकंदराबाद आणि पुणे-बेळगाव या चार मार्गांवर धावतील. पुणे, शेगाव, गुजरात, सिकंदराबाद आणि बेळगाव या शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त, रेल्वे पुणे-नागपूर मार्गावर वंदे भारत स्लीपर सुरू करण्याचाही विचार करत आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवासाचा वेळ तर वाचणारच आहे, शिवाय प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास अनुभवता येईल.
पुणे-शेगाव वंदे भारत एक्सप्रेस
ही ट्रेन कुठे थांबणार, तिकिट किती असणार याबाबात अद्याप कोणताही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
संभाव्य थांबे: दौंड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना. किंवा, मनमाड भुसावळ अकोलामार्गे
तिकीट दर: अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
पुणे-वडोदरा वंदे भारत एक्सप्रेस
संभाव्य थांबे: लोणावळा, पनवेल, वापी, सूरत, वडोदरा.
प्रवासाचा वेळ: सध्याच्या गाड्यांच्या (सुमारे 9 तास) तुलनेत हा वेळ 6-7 तासांपर्यंत कमी होऊ शकतो.
पुणे-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस
संभाव्य थांबे: दौंड, सोलापूर, गुलबर्गा, सिकंदराबाद.
प्रवासाचा वेळ: ही सेवा सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ दोन ते तीन तास वाचू शकतो.
पुणे-बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस
संभाव्य थांबे: सातारा, सांगली, मिरज, बेळगाव.
अंदाजे तिकीट दर: 1500 ते 2000 रुपये.
प्रवासाचा वेळ: प्रवासाचा वेळ दोन ते तीन तासांनी कमी होऊ शकतो. ही ट्रेन पुणे-हुबळी वंदे भारतच्या पर्यायी दिवशी चालवली जाऊ शकते किंवा तिचा विस्तार केला जाऊ शकतो.
जलद आणि आरामदायक कनेक्टिव्हिटी
या चार वंदे भारत गाड्या सुरू झाल्यानंतर पुण्याहून शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगाव या महत्त्वाच्या ठिकाणांना जलद आणि आरामदायक कनेक्टिव्हिटी मिळेल. या नवीन मार्गांमुळे या शहरांमधील आणि मार्गावरील जोडल्या जाणाऱ्या शहरांतील पर्यटनालाही चालना मिळेल.
Discussion about this post