जळगाव । पुणे विभागातून धावणाऱ्या पुणे-नागपूर आणि कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस गाड्यांना येत्या 5 सप्टेंबरपासून प्रत्येकी चार अतिरिक्त जनरल डबे जोडण्यात येणार आहेत. या बदलामुळे सुमारे 400 अतिरिक्त प्रवाशांना प्रवासाची संधी उपलब्ध होणार असून प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
पुण्यातून विदर्भाकडे जाणाऱ्या दैनंदिन प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची संख्या तुलनेने कमी असल्याने अनेकांना खासगी बसचा आधार घ्यावा लागतो. पुणे-नागपूरदरम्यान रेल्वेचे जनरल तिकीट 160 रुपये आणि स्लीपर तिकीट 380 रुपये इतके असते. त्याच्या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्ससाठी दीड ते दोन हजार रुपये खर्च करावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर मोठा ताण पडतो.
वारंवार गाड्यांमध्ये होणारी मोठी गर्दी प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत होती. उभे राहून प्रवास करणे, चढ-उताराची अडचण, तसेच तिकीट उपलब्धतेची समस्या यामुळे प्रवाशांत नाराजी होती. या समस्येवर उपाय म्हणून अनेक वेळा जनरल डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने अखेर ही मागणी मान्य केल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
परवडणाऱ्या दरात प्रवासाची संधी
पुणे-विदर्भ तसेच खान्देश-पुणे मार्गांवरील प्रवाशांची संख्या मोठी असल्याने तिकीट न मिळाल्यास खासगी प्रवासाची महागडी सोय वापरावी लागत होती. आता चार अतिरिक्त जनरल डबे जोडल्याने किमान 400 प्रवाशांची रोजची सोय होईल. यामुळे प्रवाशांना परवडणाऱ्या दरात आणि अधिक सोयीस्कर पद्धतीने प्रवास करता येईल. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे खासगी बसवरील अवलंबित्व कमी होऊन सामान्य प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.















Discussion about this post