जळगाव | अहिराणी भाषेत आमदारकीची शपथ घेणारे खान्देशातील पहिले आमदार, खान्देशची मुलुख मैदानी तोफ, वयोवृद्ध नेते गुलाबराव वामनराव पाटील यांचं मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झालं. ते 90 वर्षाचे होते. त्यांच्या निधानावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. आज त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 2 वाजता दहिवद (ता. अमळनेर) येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.
गुलाबराव पाटील यांना जनता दलाचे आमदार म्हणून 13 वर्ष काम पाहिलं होतं. त्यांच्या निधनाने खान्देशातील जुनं जाणतं नेतृत्व हरपलं आहे.मायबोली अहिराणीतूनच शपथ घेणारे ते पाहिले आमदार होते. विधानसभेत सत्ताधाऱ्यांना वेठीस धरून त्यांना सळो की पळो करून सोडण्यात ते वाकबगार होते. त्यांच्या भाषणांनी त्यांनी विधानसभाच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्र गाजवून सोडला होता. त्यामुळे मुलुख मैदानी तोफ म्हणून त्याची ख्याती पसरली होती.
गुलाबराव पाटील हे तीन वेळा निवडून आले. एकूण 13 वर्षे ते जनता दलाचे आमदार होते. शेतकर्यांसाठी शिंगाडे मोर्चा काढणे, सभागृहातून राजदंड पळवणे आदी कारणांमुळे ते सतत चर्चेत राहायचे. ते समाजवादी विचारसरणीचे होते. त्यांचा महाराष्ट्रभरात दरारा होता. फर्डे वक्ते म्हणूनही ते परिचित होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘साची संदेश’ दैनिकात पत्रकार म्हणून काम पाहिले होते. दीर्घ काळ जनता दलात राहिल्यानंतर राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील समाजवादी विचारसरणीच्या दमदार फळीतील शेवटचा नेता निखळला आहे.