नंदुरबार ! आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच पक्ष प्रवेशाचे वारे वाहू लागले असून दरम्यान, नंदूरबार जिल्ह्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री ॲड पद्माकर वळवी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत.
नुकताच पद्माकर वळवी यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांच्यासह मुंबई जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार यांची भेट घेतल्याचे त्यांचे फोटो देखील समोर आले आहेत.
लवकरच ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आदिवासी आक्रमक चेहरा म्हणून पद्माकर वळवी यांची ओळख आहे. त्यांनी जर अजित पवार गटात प्रवेश केला तर हा जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढेल. यामुळे भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसेल.
काँग्रेस सरकारमध्ये तत्कालीन क्रीडा मंत्री असलेल्या पद्माकर वळवी यांनी लोकसभेपूर्वी काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला होता. मात्र उमेदवारी न मिळाल्याने विधानसभेत त्यांनी भाजपला रामराम करत भारत आदिवासी पार्टीत प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागता होता. त्यानंतर आता ते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.















Discussion about this post