जळगाव । भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जळगाव शहरात बंडखोरीचे खिंडार पडले आहे. भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र आ.भोळे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज माजी महापौर डॉ. अश्र्विन सोनवणे यांनी बंड पुकारले आहे. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवीत असल्याची घोषणा केली.
याच मतदारसंघात माजी उपमहापौर डॉ. अश्र्विन सोनवणे यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. त्यासाठी अनेक दिवसांपासून ते प्रयत्नशील होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांना शब्दही दिला होता. मात्र, ऐन वेळेस त्यांना डावलण्यात आल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, येत्या २८ किंवा २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आपण गेल्या तीस वर्षांपासून भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहोत. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली, असे असताना पुन्हा तोच उमेदवार लादला जाणे, हा देखील जळगाववासींवर अन्यायच आहे, असेही डॉ. सोनवणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.