चाळीसगाव । चाळीसगाव येथे गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान महेंद्र मोरे यांनी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. सुरुवातीला महेंद्र मोरे यांना चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण ते उपचारांना साथ देत नव्हते. म्हणून त्यांना नाशिकच्या अशोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवली.
गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्र गोळीबाराच्या घटनांनी हादरला आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर थेट पोलिस ठाण्यात गोळीबार केला. मुंबईत मॉरिस नावाच्या व्यक्तीने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर आता चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
कार्यालय परिसरात गोळीबार
7 फेब्रुवारीला महेंद्र मोरे हे आपल्या कार्यालयामध्ये बसलेले असताना त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात महेंद्र मोरे हे गंभीरित्या जखमी झाले होते. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी हा गोळीबार झाला होता. या प्रकरणात चाळीसगाव शहर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून मात्र अजून एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.















Discussion about this post