आज 1 डिसेंबर. अर्थातच या नव्या महिन्यात अनेक गोष्टी बदल होणार. यातील आर्थिक बदलांचा परिणाम तर प्रत्येक घराला आणि प्रत्येक खिशावर होतो. यामध्ये एलजीपी गॅस सिलिंडर, एसबीआय क्रेडिट कार्डच्या नियमाचा समावेश आहे.
1. LPG सिलिंडरच्या किमती वाढल्या
आज 1 डिसेंबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेल्या बदलांवर नजर टाकल्यास, मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1754 रुपये होती, ती आता 1771 रुपये झाली आहे. देशातील इतर शहारांचा आढावा घेतल्यास व्यावसायिक सिलेंडर (कमर्शियल एलपीजी सिलेंडर) कोलकातामध्ये 1927 रुपयांना झाला असून, महिनाभरापूर्वी म्हणजेच 1 नोव्हेंबरला 1911.50 रुपये एवढी या सिलेंडरची किंमत होती. यासोबतच चेन्नईमध्ये हे सिलेंडर 1964.50 रुपयांना मिळत होतं, ते आता 1980.50 रुपयांना मिळणार आहे.
2. 17 दिवस बँक सुट्टी
जर तुम्हाला डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतंही महत्त्वाचं काम असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण डिसेंबर महिन्यातील अर्ध्याहून अधिक दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये असलेल्या बहुतांश बँकांना तब्बल 17 दिवस कुलूप लागलेलं दिसणार आहे. RBI च्या बँक सुट्टीच्या यादीवर नजर टाकली तर, या बँक सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमधील विविध सण आणि कार्यक्रमांच्या आधारावर ठरवल्या गेल्या आहेत. तसंच त्यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारच्या नियमित साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही बँकांच्या सुट्ट्यांची यादी पाहू शकता.
3. ATF किमतीत वाढ
एलपीजी सिलिंडरच्या किमतींसोबतच एअर टर्बाइन फ्यूल (ATF) ची किंमतही ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून महिन्याच्या पहिल्या दिवशी वाढताना दिसते. यावेळीही 1 डिसेंबर रोजी हवाई इंधनाच्या किमतींमध्ये बदल दिसून आला असून त्यातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विमान प्रवास महाग होऊ शकतो. ATF च्या किमतीही सलग दुसऱ्या महिन्यात वाढल्या आहेत. 1 नोव्हेंबर रोजी, नवी दिल्लीतील ATF ची किंमत 3.3% ने वाढून 90,538.72 रुपये प्रति किलोलीटरपर्यंत पोहोचली होती. त्यात आता पुन्हा वाढ झाली असून, ATF थेट 91,856.84 रुपये प्रति किलोलीटर एवढं महाग झालं आहे. याशिवाय मुंबईत या किमती 84,642.91 रुपयांवरून 85,861.02 रुपये झाली आहे. त्यामुळे हवाई प्रवास महागणार का हे पाहावं लागणार आहे.
4. SBI क्रेडिट कार्ड नियम
1 डिसेंबर 2024 पासून होणारा तिसरा मोठा बदल क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांशी संबंधित आहे. विशेषत: हा बदल SBI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी आहे. SBI कार्ड्सच्या वेबसाइटनुसार, 48 क्रेडिट कार्डमधील डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म किंवा मर्चंटशी संबंधित व्यवहारांवरील रिवॉर्ड पॉइंट पहिल्या आजपासून रद्द केले जातील अशी घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे ते रिवॉर्ड पॉइंट आज रद्द होऊ शकतात.
डिसेंबरमध्ये अनेक महत्त्वाच्या कामांची मुदत संपणार?
UIDAI द्वारे मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर रोजी संपत आहे, याशिवाय ॲक्सिस बँक या महिन्याच्या 20 डिसेंबरपासून त्यांच्या क्रेडिट कार्डच्या शुल्कात बदल करणार आहेत. यावरील आर्थिक शुल्क दरमहा 3.6 टक्क्यांवरून 3.75 रुपये करण्याची तयारी सुरू आहे.
Discussion about this post