मध्यप्रदेशमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव कार झाडावर आदळल्याने ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना उमरिया जिल्ह्यातील पाली रोडवर घडलीय.
या अपघातात मृत्यू झालेले पाच जण शहडोल येथील रहिवासी आहेत.एसडीओपी पाली यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवसाची पार्टी करुन सर्वजण मदारी ढाब्यावरून शहडोलकडे परतत होते. यावेळी उमरिया जिल्ह्यातील पाली पोलिस स्टेशन अंतर्गत घुंघुटी चौकीच्या माझगवान गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट झाडावर आदळली. अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जणांचा जिल्हा रुग्णालयात पोहोचताना मृत्यू झाला.
मृतांमध्ये शहडोल जिल्ह्यातील खनिज विभागात कार्यरत असलेले पुष्पेंद्र त्रिपाठी, जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात अवनीश दुबे यांच्यासह ५ जणांचा समावेश आहे. ही घटना इतकी भीषण होती की, वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Discussion about this post