जळगाव | जळगाव MIDC औद्योगिक वसाहतीतील भुखंड क्रमांक K-73 (K सेक्टर) येथे असलेल्या साई किसान ठिबक नळी उत्पादन कंपनीला बुधवारी रात्री अंदाजे 9 वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. घटनास्थळी उप विभागीय अधिकारी (जळगाव), उप विभागीय पोलीस अधिकारी, तसेच नायब तहसीलदार हे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत हजर होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दिलेल्या सूचनांनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी MIDC व महानगरपालिका अग्निशमन दलाचे बंब वाढवण्यात आले. तसेच सर्व संबंधित यंत्रणांमध्ये त्वरित समन्वय साधण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना देण्यात आले. परिसरात सुरक्षेची पुनर्तपासणी करून जखमी असल्यास त्वरित वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
घटनास्थळावरून जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, “औद्योगिक क्षेत्रातील आपत्तीजन्य घटनांमध्ये त्वरित प्रतिसाद आणि सर्व यंत्रणांमधील प्रभावी समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा आपत्तीच्या प्रसंगी जीवित आणि संपत्तीचे रक्षण करण्यासाठी सर्व विभागांनी सदैव तत्पर राहिले पाहिजे.”
दरम्यान, महानगरपालिका, MIDC अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सलग आणि समन्वयित पद्धतीने मदत व अग्निशमन मोहीम राबवली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आग पसरू नये यासाठी आसपासच्या परिसराची सुरक्षा तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाय तातडीने राबवण्यात आले. जिल्हा प्रशासन, अग्निशमन दल, MIDC, महानगरपालिका आणि पोलिस दलांनी दाखविलेल्या तातडीच्या प्रतिसादामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.















Discussion about this post