जळगाव । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या आमदारांसंदर्भात अपात्रतेबाबतची ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे आमदार अपात्र होतील व हे सर्व अपात्र झाल्यास ते भाजपमध्ये जातील, अशा चर्चांना राज्यात उधाण आला आहे. या विषयावर बोलताना जळगावतील पाचोरा तालुक्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.
एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. आम्हाला भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवायची असेल तरी तो मान्य असेल. एकनाथ शिंदेंनी आम्हाला सांगितलं की घरी बसा तर आम्ही घरी बसू, असे आमदार किशोर पाटील यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आमदार किशोर पाटील म्हणाले की, आम्ही सर्व चाळीस आमदार आहोत, असे असताना केवळ १६ आमदार अपात्र कसे होतील? आपल्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे. मात्र, आम्ही ४० आमदार हे अपात्र होणारच नाही, असा विश्वास सुद्धा यावेळी आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मात्र, जर अपात्रतेची कारवाई झाली तर आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले तर आम्ही भाजपच्या कमळ चिन्हावर सुद्धा निवडणूक लढवू . भाजपच्याच काय पण एकनाथ शिंदे यांनी सांगितले तर आम्ही अपक्ष सुद्धा निवडणुका लढवू. एवढंच नव्हे तर एकनाथ शिंदे यांनी जर सांगितलं की, घरी बसा तर आम्ही घरी सुद्धा बसू. कारण एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. ते मुख्यमंत्री आहेत त्यांनी केलेल्या सूचनांचं आम्ही पालन करू, अस आमदार किशोर पाटील यांनी सांगितले . अपात्रता हे न्यायालयीन बाब आहे. मात्र, मी काही या विषयाचा तज्ञ नाही. मात्र सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून कुठलेही अडचणी येणार नाही, अशा पद्धतीने नेते हा निर्णय घेतील, असे मला वाटत असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
Discussion about this post