जळगाव : धरणगाव येथून जळगाव दोंडाईच्या बसने नातेवाईकाच्या लग्नाला जात असताना बसमध्ये बसलेल्या महिलांनी बॅगेत ठेवलेले दागिने हातोहात लंपास केले. या प्रकरणाचा जलद गतीने तपास करत अंमळनेर पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. गंगा चैना हारगळे (वय ४०), गंगा सुभाष नाडे (वय ४४, दोन्ही रा. नेताजी नगर, यवतमाळ ता. जि. यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पावणेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रतिभा जिजाबराव पाटील या ६ मार्च रोजी धरणगाव येथून जळगावला नातेवाईकांच्या लग्न समारंभात जात होत्या. यावेळी बसमधून प्रवास करत असताना त्यांनी सोन्याच्या बांगड्या व पोत पर्समध्ये ठेवून ती पर्स बँगेत ठेवली होती. यावेळी त्यांच्या शेजारी दोन महिला बसल्या होत्या. त्या अमळनेर येथील चोपडा नाक्यात स्टॉपजवळ उतरल्या. काही वेळाने त्यांनी आपल्या बँगेतील पर्स चेक केली असता दागिने मिळून आले नाहीत. त्यानंतर त्यांनी अंमळनेर पोलिसात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ व तांत्रिक माहितीच्या आधारे वरूड (जि. अमरावती ) येथून दोन महिलांना अटक केली.
संशयित आरोपी महिलांनी वास्तव्याचे ठिकाण जळगाव, अकोला, बार्शी टाकळी, परतवाडा, मध्य प्रदेश राज्यातील शिगाव, इंदौर अशा ठिकाणी वेळोवेळी बदलविले होते. शेवटी त्यांना वरुड येथील आठवडे बाजार भागातून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली असून त्याच्याकडून पावणेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अमळनेर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस उप-निरीक्षक नामदेव बोरकर, मिलींद सोनार, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, निलेश मोरे, उज्वलकुमार म्हस्के, अमोल पाटील, गणेश पाटील तसेच महिला होमगार्ड निलीमा पाटील यांनी केली.
Discussion about this post