अकोला । राज्यात एकीकडे महिलांसह तरुणींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नसून अशातच न्याय देणाऱ्या संस्थेतच जर महिलाच असुरक्षित असतील, तर सामान्य महिलांचं काय? असा सवाल निर्माण करणारी धक्कादायक घटना अकोल्यातून समोर येत आहे.एका महिला न्यायाधीशाचा विनयभंग केल्याप्रकरणी एका वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ दिपांकर तेलगोटे असे आरोपी वकिलाचे नाव आहे.
गेल्या वर्षभरापासून सौरभ तेलगोटे हा पीडित उच्च पदस्थ अधिकारी महिलेला त्रास देत होता. तक्रारीनुसार, गेल्या वर्षभरापासून तेलगोटे पीडित महिलेला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. त्याने समाजमाध्यमांवर अश्लील संदेश पाठवणे, अश्लील चॅटिंग करणे, अश्लील इशारे करणे यासारख्या प्रकारांनी पीडितेचा छळ केला.
तसेच महिलेच्या कार्यालयात थेट घुसून वारंवार गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं रामदास पेठ पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांतर्गत आरोपी सौरभ दीपांकर तेलगोटेवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपीला २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, न्यायालयातच एका उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याचा सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ करण्याचा प्रयत्न झाल्याने अकोल्याच्या न्यायालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Discussion about this post