नवी दिल्ली । एकीकडे कांद्याचा प्रश्न बिकट होत असताना, शेतकरी सातत्याने निर्यात खुली करण्याची मागणी करत आहे. यातच आता वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय नवी दिल्ली यांनी गुजरातच्या सफेद कांद्यास निर्यातीकरिता मंजुरी दिली. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
देशातून २ हजार मेट्रिक टन सफेद कांदा निर्यातीस परवानगीची माहिती नोटिफिकेशन काढून दिली आहे. सफेद कांदा हा मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यात पिकत असून, या कांद्यास निर्यातीला परवानगी देऊन केंद्राने एकप्रकारे महाराष्ट्र राज्यावर अन्याय केल्याची भावना शेतकरी आणि व्यापारी करत आहे.
मागील महिन्यात केंद्राने काही देशांमध्ये एनइसीएलमार्फत कांदा निर्यातीस परवानगी दिली होती. मात्र, यंदा सफेद कांदा निर्यातीसाठी कुठलीच अट टाकलेली नाही. त्यामुळे गुजरातच्या कांद्याला एक न्याय अन् महाराष्ट्रच्या कांद्याला वेगळा न्याय का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. कांदा निर्यातबंदी घातल्याने देशांमध्ये कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले होते.
उन्हाळ कांद्याला ७०० पासून १५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मात्र, मुबलक कांदा उपलब्ध असतानाही फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्यातबंदी लादल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून कांद्याचा खेळ सरकारने मांडला आहे. यामध्ये करोडो रुपयांचा फटका सरकारला बसला आहे.















Discussion about this post