जळगाव । शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. अशातच जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ज्ञानेश्वर तुकाराम बारी असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे ज्ञानेश्वर बारी हे आपल्या पत्नी, मुलगा आणि सुन यांच्या सोबत वास्तव्याला होते. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. शेतातील सततच्या नापिकीला कंटाळून त्यांनी सोमवारी ८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या पुर्वी त्यांच्या शिरसोली शिवारातील शेतात अंब्याच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांचा पुतण्याच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात जाऊन पंचनामा करून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे शिरसोली गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुशिला बाई, मुलगा सचिन, विवाहित मुलगी आणि सुन असा परिवार आहे.















Discussion about this post