जळगाव । परतीचा पाऊस जळगाव जिल्ह्यात पुन्हा धुमाकूळ घालताना दिसत असून यातच अंगावर वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील चुंचाळे शिवारात घडली. पांडुरंग त्र्यंबक महाजन (वय ६५) असे मयत शेतकरी यांचे नाव आहे.याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण होते.
पांडुरंग महाजन हे निवृत्त शिक्षक होते. पांडुरंग महाजन हे नेहमीप्रमाणे दिनांक १८ रोजी आपल्या शेतात गेले असताना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पावसालां सुरुवात झाली. यावेळी शेतात वीज पडून शेतकरी पांडुरंग महाजन यांचा मृत्यू झाला.
दुसरीकडे चुंचाळे येथे प्रकाश चिंधा महाजन यांच्या शेतातील १ बैल, २ वासरू देखील वीज कोसळल्याने ठार झाले आहेत. घटनेची नोंद घेण्याचे काम पाचोरा पोलीस स्टेशनला सुरू होते. नगरदेवळा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे परिसरात विजेचा प्रवाह खंडीत झाला आहे.