जळगाव : जळगाव तलुक्यातून दुर्दैवी घटना समोर आलीय. शेतात काम करणाऱ्या शेतकरी दाम्पत्यावर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी जखमी झाली आहे. सदरची घटना जळगाव तालुक्यातील वडली शिवारात घडली.
जळगाव तालुक्यातील वडली येथील विकास चूडामण पाटील (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. विकास पाटील यांचे वडली शिवारातच शेती असून, पती- पत्नी शेती करून उदरनिर्वाह करीत होते. नेहमीप्रमाणे पती- पत्नी १७ ऑक्टोम्बरला शेतात गेले होते. शेतात काम करीत असताना सकाळी दहा ते अकराच्या सुमारास मधमाश्यांचे मोहोळ उठले आणि त्यांनी विकास पाटील व त्यांची पत्नी रत्नाबाई पाटील (वय ५०) यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या हल्ल्याने घायाळ पती-पत्नी जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावत सुटले.
घडल्या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मदतीला धाव घेतली. मात्र तोपर्यंत मधमाश्यांच्या हल्ल्यात दोघेजण बेशुद्ध झाले होते. बेशुद्धावस्थेत पडलेल्या जखमी पती-पत्नीला खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून विकास पाटील यांना मृत घोषित केले. तर रत्नाबाई पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत.