तळोदा (नंदुरबार) : पिकांच्या वाढीसाठी शेतकरी रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असते. मात्र अनेक ठिकाणी बोगस खत विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशातच नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात कृषी विभागाकडून बोगस खत विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या पथकाकडून शिर्वे शिवारातून तीन लाख रुपये किमतीचे बोगस खत जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एका व्यक्तीसह कंपनीविरुद्ध तळोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा तालुक्यातील शिर्वे शिवारात एकजण बोगस खते विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन तपासणी केली असता सायसिंग राऊत यांच्या घराजवळील गोदामामध्ये खतांच्या गोण्या आढळून आल्या. पथकाने खताची तपासणी केली असता संबंधित खत हे बोगस असल्याचे निदर्शनास आले. याठिकाणी एकुण १५० गोण्या खत जप्त करण्यात आले. त्याची किंमत तीन लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
बोगस खत विक्री प्रकरणी गुन्हा दाखल
दरम्यान सायसिंग याच्याकडे खत विक्रीचा कुठलाही परवाना नसल्याचे आढळून आले. त्यानुसार सायसिंग राऊत व संबंधित कंपनीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा अधिनियम व खत नियंत्रण आदेश नुसार तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई भरारी पथक प्रमुख किशोर हडपे कृषी विकास अधिकारी नंदुरबार स्वप्निल शेळके, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नीलिमा वसावे यांनी केली.
Discussion about this post