जळगाव । जळगाव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा बनावट शिक्का व स्कॅन केलेल्या सहीद्वारे आरोग्य सेवक पदाचा बनावट नियुक्ती आदेश तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .या प्रकरणी नियुक्ती पत्र तयार करणाऱ्या भुसावळ येथील तरुणाविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवक पदासाठी भरती प्रक्रिया राबवून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने उमेदवारांचे नियुक्ती आदेश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले.
याच आदेशाचा संदर्भ वापरून भुसावळ येथील अमोल कैलास सुशीर याने आरोग्यसेवक पदावर नियुक्तीचा आदेश बनवून घेतला. बनावट नियुक्ती आदेश बनवून सार्वजनिक आरोग्य विभागाचा तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा शिक्का व स्कॅन केलेली सही वापरल्याचे आढळून आले आहे. दरम्यान बनावट आदेश मुक्ताईनगर पंचायत समितीच्या कार्यालयीन अधीक्षकांकडून जिल्हा परिषदेच्या सहायक प्रशासन अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या बनावट आदेशात व मूळ आदेशात तफावत आढळून आलेली आहे.
आरोग्य सेवक पद नियुक्तीसाठी संबंधिताने बनावट सही, शिक्के वापरून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून अमोल सुशीर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Discussion about this post