पुणे । इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षेच्या अर्जासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर आता आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावीसाठी मुदतवाढ आणि बारावीसाठी विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी वाढीव तारखा जाहीर करण्यात आल्यात.
महामंडळाने इयत्ता दहावीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्जाची मुदत वाढविण्यात आली आहे. यास आणखी विलंब झाल्यास विलंब शुल्कासह १ ते ८ डिसेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. इयत्ता बारावीसाठी विलंब शुल्कासह २१ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहेत. अर्जाचे शुल्क भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आलीये.
मार्च २०२४ परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सादर करता येत आहेत. नियमित विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी यांसाठी देखील www.mahahsscboard.in या संकेतस्थळ अर्ज करता येणार आहे. श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरता येणार आहेत.
दहावी बारावीचं वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्वाचं आणि आयुष्याला कलाटणी देणार मानलं जातं. त्यामुळे आतापर्यंत काही कारणास्तव अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थांना आणखी एक संधी म्हणून ही तारीख वाढवण्यात आली आहे. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ या कालवधीत होणार आहे.