धुळे : लग्न जमत नसल्याने अनेकजण एजंटच्या माध्यमातून नवरी मुलगी शोधत असतात. मात्र यातून फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच एक प्रकार धुळ्यातून समोर आला आहे. मुलाला बनावट नवरी व तिचे बनावट कुटुंब दाखवून फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे.
धुळे शहरातील लग्नाळू मुलासाठी मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम एजंटच्या माध्यमातून गेल्या महिन्यात झाला होता. त्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांना एजंटकडून फोन आला की बघितलेल्या मुलीला आणखी इतर स्थळ आले असून आपणास लग्न करावयाचे असल्यास तीन लाख रुपये तात्काळ द्यावे. त्यानुसार मुलाच्या कुटुंबीयांनी तीन लाख रुपयांची जुळवाजुळव करून संबंधित एजंटला दिले. त्यानंतर २५ ऑगस्टला मध्य प्रदेश येथील बिजासन मातेच्या मंदिरात लग्न देखील लावण्यात आले.
लग्न लागल्यानंतर वऱ्हाड धुळ्याकडे येत असताना सोनगीर येथे मुलीच्या आईने भूक लागल्याचा बहाणा करत हॉटेलवर थांबण्यास सांगितले. तेथे आधीच उभे असलेल्या दुचाकी धारकांसह मायलेकींनी पोबारा केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर (Dhule Police) चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली. चाळीसगाव रोड पोलिसांनी अत्यंत शिताफीने या सर्व बनावट नवरी व तिच्या बनावट कुटुंबीयांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून सर्वाना मध्य प्रदेशातून अटक केली आहे. आता या टोळीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का? याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Discussion about this post